पुणे – नाशिक फाटा (nashik fata) ते खेड (Khed) दरम्यान चौपदरीकरण करताना झालेल्या भूसंपादनाची भरपाई संबंधितांना मिळावी यासाठी लागणारा 250-300 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांना केली आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रातील गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 प्रमुख शहरांना जोडणाऱ्या पुणे-नाशिक (Pune-nashik) या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण जेव्हा झाले होते,

त्यावेळी भूसंपादनाचा मोबदला काही शेतकऱ्यांना दिला गेला नव्हता. आता एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भूसंपादनाचे काम #NHAI कडून सुरू करण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

जोपर्यंत चौपदरीकरण करताना घेतलेल्या आमच्या जमिनीचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत हे नवीन भूसंपादन आम्ही होऊ देणार नाही, अशी या शेतकऱ्यांची भूमिका आहे.

स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचे भूसंपादन सुद्धा तत्काळ सुरू होऊन हे काम मार्गी लागावं, अशी माझी ठाम भूमिका आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण करताना जेव्हा भूसंपादन केले गेले,

त्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी जवळपास 250-300 कोटींचा निधी अपेक्षित आहे. तो निधी उपलब्ध करून देऊन हा तिढा कायमचा सोडवावा,

यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) विनंती केली आहे. तसेच, नितीन गडकरी नेहमीप्रमाणे ताबडतोब कार्यवाही करतील, हा विश्वास आहे. असं ते म्हणाले आहे.