पुणे – केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या रविवारी (20 नोव्हेंबर) पुणे शहराच्या (Shivsrushti) दौऱ्यावर येणार असून, पुण्यातील आंबेगाव नऱ्हे या ठिकाणी साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे ते लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर उपस्थित राहणार आहेत.

मात्र, आता अमित शहांचा हा दौरा रद्द झाल्याचं समोर आलं आहे. काही अपरिहार्य कारणास्तव अमित शहा यांचा पुणे दौरा स्थगित करण्यात आला असून, त्यामुळे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

रविवारी 20 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते या शिवसृष्टीच्या (Shivsrushti) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार होते, मात्र आता ते रद्द करण्यात आले आहे.

शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे.

शिवाय गड-किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका आदी प्रसंग थ्री-डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम म्हणाले, की काही अपरिहार्य कारणास्तव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रविवारी नियोजित असलेला पुणे दौरा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा आता पुढील महिन्यात प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाचा खर्च साधारण 438 कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात 60 कोटी रुपये उत्स्फुर्तपणे देणगीदारांकडून आतापर्यंत या प्रकल्पाला मिळाले आहेत. तसेच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी उपलब्ध झाला आहे.