पुणे – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावरून सध्या या दोन पक्षांमध्ये चांगलाच राडा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, आता या चित्रपटाच्या शो वरून मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात सिटी प्राइड या चित्रपटगृहात पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येत बुधवारी त्यांनी सदर चित्रपटाचा शो सुरू केला.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त चित्रपट गृहाच्या परिसरात ठेवला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘राज ठाकरे जिंदाबाद’ अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे सिटी प्राइड चित्रपट गृहात फडकवले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे समर्थन केले असून त्याबाबत सक्रिय पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.

मनसे नेते बाबू वागस्कर आणि पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, राज ठाकरे यांना चित्रपट भूमिकेवरून विरोध कोण करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. पुण्यात 11 ठिकाणी या चित्रपटाचे शो सुरू आहे त्याजागी आम्ही संरक्षण देणार आहे. असं ते म्हणाले.

तर दुसरीकडे मनसेचे अजय शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचा कोणी चित्रपट बंद पडण्याचा प्रयत्न करत असेल तर मनसे सैनिक रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन यापुढे करणार आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणाला घाबरु नये.

प्रेक्षकांना कोणी चित्रपट गृहात मारहाण करत असे तर त्यांचे हात तोडण्याची धमक मनसे कार्यकर्त्यांना मध्ये आहे. प्रेक्षक जबाबदारी आम्ही घेतो आहे. असं अजय शिंदे यावेळी म्हणाले.