पुणे – पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहर (Pune) आणि पिंपरी चिंचवड (pimpri-chinchwad) परिसरातील नागरिकांना यापुढे आपल्या घरात श्वान पाळण्यासाठी ७५ रूपये व नूतनीकरणासाठी ५० रूपये शुल्क मोजावले लागणार आहे. घरात पाळीव प्राणी पाळण्याचा अनेकांना छंद असतो. पण यासाठी आता पालिकेचा परवाना (license) असणं महत्त्वाचं आहे.

पुण्यामध्ये श्वान घरी पाळण्यासाठी पालिकेचा परवाना घ्यावा लागतो, याप्रमाणे आता मांजर (cats) पाळण्यासाठीही पालिकेची परवानगी असणं महत्त्वाचं आहे. यासंबंधी महत्त्वाचा आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे.

नुकतंच पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी श्वान पाळण्यासाठी ७५ रूपये व नूतनीकरणासाठी ५० रूपये शुल्क पालिकेने निश्चित केले होते.

पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने हा परवाना दिला जातो. त्याचपध्दतीने मांजर पाळण्यासाठी परवाना आवश्यक करण्यात आला असून त्यासाठी श्वान परवान्याप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे.

खरंतर, आधी फक्त श्वान पाळण्यासाठी नियम होते. मात्र, मांजर पाळण्यासाठी कुठलेही नियम नव्हते. पण आता पुण्यात मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मांजर पाळण्यासाठी आता तुम्हाला अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि ५० रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. इतकंच नाहीतर अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे.

याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरामध्ये १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत. मात्र, आत्तापर्यंत फक्त ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.

मांजर पाळण्यास परवाना देतानाच्या अटी-शर्ती जाणून घ्या..!

 • नवीन परवाना देण्यासाठी 75 रुपये शुल्क, नुतनीकरणासाठी 50 आणि विलंब शुल्क 10 रुपये असणार
 • परवान्याची कायदेशीर मुदत एक वर्षांपर्यंत असून तो दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक
 • परवाना सोबत बाळगणे आवश्यक, महापालिका आयुक्त किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या प्राधिकृत अधिका-याने मागणी करताच सादर करणे आवश्यक
 • मांजरास रेबीज लसीकरण बंधनकारक राहील
 • परवाना धारकाना सार्वजनिक ठिकाणी मांजर मोकळे सोडू नये
 • मांजरापासून कोणाला दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी
 • आरोग्य, पर्यावरणाच्या दृष्टीने मांजरामुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी
 • मांजरापासून कोणत्याही प्रकाराचा उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी
 • कोणत्याही व्यक्तीने परवाना प्राप्त केल्याशिवाय मांजर पाळू नये, परवाना घेतला असेल, त्याचे नुतनीकरण केले नसल्यास विनापरवाना मांजर पाळले आहे असे समजून नियमानुसार कारवाई
 • परवाना घेतल्यानंतर मानवी आरोग्यास, सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणावरुन तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई केली जाईल. परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेने रोखून ठेवले आहेत.
 • या अटी-शर्तीस अधीन राहून मांजरास ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्यात येणार आहे