पुणे – महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सामाजिक संस्था राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करीत आहेत. यानिमित्त बुधवार पेठेतील (budhwar peth) एचआयव्ही बाधित ९० महिलांना पोषण आहार देण्यात आला. राजेंद्र तापडिया यांच्या भगीरथ तापडिया ट्रस्टच्या माध्यमातून पोषण आहार महिलांना देण्यात आला आहे.

यावेळी आर्ट ऑफ लिविंग चे राजेजी शास्त्रेय, पोलीस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के, तापडिया ट्रस्टचे संदेश मानकर, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले,

गणेश बाकले, अस्मिता शिंदे, आशा भट, दीपक निकम व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी ध्यान शिबिराची अनुभूती घेतली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत सरकारी कार्यालयास निर्देश दिले आहेत,

त्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील सामाजिक संस्था देखील महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून प्रेरित होऊन राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करत आहेत.

शेखर मुंदडा म्हणाले, समाजाने देहविक्री करणाऱ्या महिलांकडे देखील आदराने पाहणे गरजेचे आहे. आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून या महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.