आळंदी – वारकरी संप्रदायाच्या भाविकांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा प्रस्तावित आहेत. यामध्ये आळंदी (Alandi) तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि इंद्रायणी नदीच्या सुधार योजनेसाठी अनेक प्रकारच्या तरतुदी होणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि शिवसेना (Shivsena) पदाधिकारी यांनी एक प्रस्ताव सादर करावा. याबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी येथे केले.

काही धार्मिक विधींसाठी त्या आळंदीमध्ये (Alandi) कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या. शासकीय विश्रामगृहांवर पत्रकारांशी बोलताना त्या (Neelam Gorhe) म्हणाल्या, ‘देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी पर्यटनासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबविण्यात येत आहे.

त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार आणि विकासाची संधी उपलब्ध होत आहे. या धर्तीवर आळंदी नगर परिषदेच्या लगतच्या गावांनी याबाबत पुढाकार घेतल्यास तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रम राबवता येईल.

इंद्रायणी नदी संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन असे अनेक विषय हाताळता येण्याजोगे आहेत. स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि पर्यावरणवादी व्यक्ती संघटनांनी याबाबत पुढे येण्याची आवश्यकता आहे.

केवळ आळंदीच नव्हे तर खेड तालुक्यातील भीमाशंकर, सिद्धेश्वर मंदिर अशा ठिकाणीही पर्यटन सुविधा अधिकाधिक झाल्या पाहिजेत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड परिसरातील रेड झोनचा प्रश्नही मार्गी लागण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या मागणीवरून पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, यावेळी शिवसेना पदाधिकारी राम गावडे अविनाश तापकीर, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.