पुणे – उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना (pune) आता पावसाच्या थेंबांनी काहीसा दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र, आता अश्यातच आरोग्य विभागाने पुणेकरांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे. हलक्या सरी सुरू झाल्याने डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

या महिन्यात आतापर्यंत 86 हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालयात (KEM Hospital) अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत.

शहरात डेंग्यूच्या काही तुरळक केसेस समोर येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूचा उद्रेक झालेला नाही. त्याचे स्वरूप चक्रीय असल्याने, जुलैच्या मध्यात उद्रेक होण्याची शक्यता आहे.

शिवाय, वारीनंतर (Pandharpur Wari) नारळाच्या शेंड्या आणि वाट्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. सध्यातरी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही चिंता आहे, असे केईएमतर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अशीच परिस्थिती राहिल्यास गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू (Dengue), टायफॉईड, चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे जर कोणाला या

प्रकारातील लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, डेंग्यू (Dengue) आणि इतर आजारांबाबत सोसायट्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचीही महापालिकेची योजना आहे.

लोकांनी त्यांच्या भागात पाणी साचणार नाही, स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.