Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महापुरात कोल्हापूरच्या मदतीला धावले पुणे

कोल्हापूर शहराला बसलेल्या पुराच्या फटक्यामुळे तेथील जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले असून, टँकरची संख्यादेखील अपुरी असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ही अडचण लक्षात घेऊन पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने त्वरित कोल्हापूरला मदत पाठवली आहे. कोल्हापूरचे जलशुद्धीकरण प्रकल्प केंद्र सुरू करून दिले जाणार आहेत.

१७ टँकर कोल्हापूरला रवाना

कोकण व कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर या शहरांमध्ये खूप नुकसान झाले आहे. कोल्हापूरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडले आहेत.

त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोल्हापूर महापालिकेकडे टॅंकरची संख्या अपुरी असल्याने अडचण होत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांनी पुणे महापालिकेकडे मदतीची मागणी केली, त्यानंतर त्वरित मदत देण्याची तयारी दर्शविली. पाणी पुरवठा विभागाचे १७ टँकर काल कोल्हापूरला रवाना करण्यात आले.

२१ तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक रवाना

टँकर्स बरोबरच जलकेंद्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे २१ तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक कोल्हापूरला पोहोचले आहे. पुढील एक आठवडा हे कर्मचारी कोल्हापूरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करणार आहे.

या कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कोल्हापूर महापालिकेने केली असून, आपत्तीच्या काळामध्ये, इतर शहरांना मदत करण्याची पुणे महापालिकेची परंपरा सुरू आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले

 

Leave a comment