पुणे – दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतली असून, राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परत गेले आहेत. त्यामुळे आता पावसाने निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे. आता वातावरणात बदल झाला असून, राज्याच्या अनेक भागात सध्या थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने (Weather) बदल होत आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे. सध्या पुण्यात ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून पुणे शहरात थंडीचा जोर वाढल्याचं मिळत आहे.

दरम्यान, सोमवारी (ता. २१) यवतमाळ आणि अमरावती येथे थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसा ऊन असतानाही गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवत आहे. तर नाशिक, धुळे, जळगाव, यवतमाळ व नगर या भागांत थंडीच्या लाटेसारखी स्थिती होती.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वरसारखी थंड वातावरणाची अनुभूती आता विविध जिल्ह्यांमध्ये येत आहे. रविवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ८.५ अंश सेल्सिअस झाली.

दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट अपेक्षित आहे. त्यामुळे थंडीचा कडाका असाच कायम राहू शकतो.

येथे पारा कमी…

जालना – १२
नांदेड – १२.४
जळगाव – ८.५
सातारा – १२.६
नाशिक – ९.८
परभणी – ११.५
औरंगाबाद – ९.२
बारामती – १०.१
पुणे – ९.७