पुणे – पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला (TMV) आयएसओ मानांकन ( ISO accreditation) प्रदान करण्यात आला आहे. आयएसओचे अधिकारी महेश मालपाठक यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला (TMV) हे मानांकन प्रदान केल्याचं जाहीर केलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला (TMV) आयएसओ ‘21001ः 2018’ मानांकन मिळाले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळविणारे ‘टिमवि’ हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

राष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या ‘टिमवि’ने नुकतीच शतकोत्तर वाटचाल पूर्ण केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

विद्यापीठातील विविध विभागांत गुणवत्तापूर्ण शिक्षण व सोयीसुविधा देण्यात येतात. शिक्षणपद्धती व गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनासाठी टिमविला ‘आय.एस.ओ. 21001ः 2018’ मानांकन जाहीर करण्यात आले आहे.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आय.एस.ओ. चे अधिकारी थेऊन्स कोटेझा यांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या ‘जाणिवा कर्मयोगाच्या’ पुस्तकाचे यावेळी प्रकाशन होणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या, विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण झाली असून राष्ट्रीय शिक्षणाच्या ध्येयाने हे विद्यापीठ कार्यरत राहिले आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीत नवनवीन बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार विद्यापीठात दर्जात्मक शिक्षण दिले जात असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे ‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती विद्यापीठाने राबविली.

विद्यापीठातील गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षणामुळे विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. विद्यापीठातील विविध विभागांनी कायमच शैक्षणिक दर्जाची उंची टिकवून ठेवली. असं देखील त्या यावेळी म्हणल्या.