पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील चांदणी चौका प्रमाणेच इतर भागामध्ये सुद्धा तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे शहरातील ही वाहतूक कोंडी कधी फुटणार असा सवाल नेहमीच पुणेकरांच्या मनात उपस्थित होत असतो.

चांदणी चौका प्रमाणेच मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावरील मुंढवा परिसरात सुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथील रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या घरांचा व भूसंपादनाचा प्रश्न सोडवण्यास महापालिका असमर्थ ठरली आहे.

येथील रेल्वे उड्डाणपूल ते महात्मा फुले चौकातील सिग्नलपर्यंत रोज वाहतूक कोंडी होते. यामागील मुख्य कारण रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने व काही घरे असून, सध्या येथून एकावेळी दोन वाहने जातील, एवढाच रस्ता शिल्लक आहे.

अडथळा ठरणाऱ्या नागरिकांना महापालिका काय मोबदला देणार, याबाबत स्पष्टता नसल्याने हा प्रश्न रखडल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात झपाट्याने नागरीकरण वाढत असून, अनेक आयटी कंपन्या येथे कार्यरत आहे.

त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मगरपट्टा, मुंढवा, खराडी रस्त्यावरील अडथळे दूर करण्याकरिता नागरिक तयार आहेत. मात्र, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी निणर्य घेत नाहीत. अशी तक्रार रहिवासी करत आहेत.

पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडीज बेंझचे ‘CEO’ :

काही दिवसांपूर्वी मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ ‘मार्टिन श्वेंक’ (martin schwenk) यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. यावेळी ‘मार्टिन श्वेंक’ यांना पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याच पाहायला मिळालं होत.

आपल्या पोस्टमध्ये ‘मार्टिन श्वेंक’ म्हणतात.., “जर तुमची एस-क्लास पुण्याच्या रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकली तर तुम्ही काय करता? कदाचित कारमधून उतरून काही किलोमीटर पायी चालणं सुरू करता आणि मग रिक्षा पकडता”.