मान्सूनने राज्यात दाखल झाला असून, येत्या १ ते २ दिवसांत शहरात मान्सून दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.
पुढील सहा दिवस पावसाचे असून, यादरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरात गेले चार दिवस ढगाळ हवामान असून, पाऊस पडत आहे. या दरम्यान, जोरदार पाऊसही पडला आहे.
त्यामळे उकाड्याने हैराण झालेल्या शहराला दिलासा आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत लोहगाव येथे १५ मि.मी., वडगावशेरी १३, मगरपट्टा ५, शिवाजीनगर ३, पाषाण २.८, कोरेगाव पार्क १ तर हडपसर येथे १ मि.मी. पावसाची नोंद झाली. सध्या मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे.
शहरात ऊन, पाऊस व ढगाळ हवामान असल्यामुळे तापमानात बदल होत आहे. उकाडा कमी झाला आहे. गुरुवारी कमाल तापमान ३४.९, तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे.
येत्या ७ ते ९ जून दरम्यान, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर १० ते १२ जून दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता आहे.