पुणे: पुणेकरांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मेट्रोची पहिली औपचारिक ट्रायल रन आज सकाळी पार पडली. एलेव्हेटेड मार्गावर जणू पुणेकरांचे स्वप्न धावले.

नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता

वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर मेट्रो धावली. पहिल्यांदा ट्रायल रन होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळची वेळ असूनही मेट्रो मार्गावर काही लोक उपस्थित होते. आज केवळ तांत्रिक चाचणी असल्याने कुणीही गाडीतून प्रवास केला नाही.

मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण या वेळी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे एमडी ब्रीजेश दीक्षित हे या वेळी उपस्थित होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या पाच किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.

Advertisement

गर्दी टाळण्यासाठी सकाळी ट्रायल

कोरोनाचे संकट असल्यामुळं पुणेकरांना त्रास होऊ नये, म्हणून ट्रायल रन सकाळी लवकर घेतल्याची माहिती पवार यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्वी कार्यक्रमांना गर्दी झाल्यामुळं संयोजकांवर गुन्हा दाखल झाले आहेत. तसे आज होऊ नये म्हणून कमीत कमी उपस्थितीत कार्यक्रम घेतला, असं पवार यांनी सांगितले.

मेट्रोचे साठ टक्के काम पूर्ण

मेट्रो प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झालं आहे,’ असं त्यांनी या वेळी सांगितलं. वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट आहे, असंही पवार म्हणाले.

Advertisement