पुण्यात दररोज फसवणुकीच्या अनेक घटना घडत असताना त्यातील किती लोकांना शिक्षा होते, हा संशोधनाचा वेगळा भाग असला, तरी पोलिसांनी चांगला तपास करणा-याला खडी फोडावी लागते, हा अनुभव एका प्रकरणातून आला आहे.
१६ लाखांची केली होती फसवणूक
लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून १६ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना/भळगट यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद आहे.
नमोए ओमोरुई ऊर्फ डॉ. पॉल नेल्सन (वय ४१, रा. नवी दिल्ली, मूळ रा. नायजेरिया) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्यासह आणखी तीन आरोपींविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. ११ एप्रिल ते २९ मे २०१८ दरम्यान कसबा पेठ परिसरात हा प्रकार घडला.
आरोपीने गुन्हा केला मान्य
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी काम पाहिले. आरोपीला ‘व्हीसी’द्वारे न्यायलयापुढे हजर करण्यात आले.
त्या वेळी आरोपीने गुन्हा कबूल करून, आतापर्यंत भोगलेली शिक्षा पुरेशी असल्याचे समजून शिक्षेतून सवलतीची मागणी अर्जाद्वारे केली.
त्यावर आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीला सवलत देणे फिर्यादीसाठी अन्याय्य ठरेल, असा युक्तिवाद सरकारी वकील क्षीरसागर यांनी केला.
या प्रकरणात त्यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, बँक व्यवस्थापकांची साक्ष महत्त्वाची ठरली. फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के यांनी या प्रकरणाचा तपास केला.
लॉटरीच्या आमिषाने गंडा
आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाइलवर मेसेज पाठवून त्यांना एक कोटी ७० लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून माहिती घेऊन विविध बँक खात्यांत १६ लाख ३२ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.