पुरंदर तालुक्यातील नियोजित विमानतळासाठी अद्याप कोणतीही जागा निश्चित केलेली नाही. तीन जागांची पाहणी करून, माहिती गोळी केली जात आहे.

तीन जागांपैकी जी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल, त्या ठिकाणी विमानतळ होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

पवार, सुळे यांची भेट घेऊन नोंदविला विरोध

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी व आंबी या भागातील विमानतळ संघर्ष समितीने शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

Advertisement

बागायती भागात विमानतळ नको

विमानतळविरोधी संघर्ष समितीने या नेत्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटले आहे, की पुरंदर तालुक्याच्या आमदारांनी या गावांमधील लोकांना विश्वासामध्ये न घेता परस्पर विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त, मुख्य कार्यकारी आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व जिल्हाधिका-यांना पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणून सुचवली आहे.

या गावांमधील रहिवासी हे मूळ शेतकरी आहेत. पुरंदर उपसा सिंचन व जानाई शिरसाई योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत.

भागातील जवळपास ७० ते ८० टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. डाळिंब, सीताफळ ,पेरू, अंजीर इत्यादी फळबागा असून ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे .

Advertisement

विमानतळासाठी शेतजमीन बळजबरीने घेतल्यास शेतकरी उद्ध्वस्त होऊन तसेच नवीन सुचवलेल्या पर्याय जागेबाबत चुकीची माहिती पुरवल्याची स्पष्ट झाले आहे, अशा भावना शेतक-यांनी व्यक्त केल्या.

 

Advertisement