राज ठाकरे यांना पडलेला प्रश्न; लोकांची माथी भडकावणे हाच नेत्यांचा उद्देश

मला प्रश्न पडतो मराठा आरक्षण सर्वांना मान्य आहे, मग नेमकं अडलंय कुठं ? मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का ? असे संतप्त सवाल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

आरक्षणावरून सर्व पक्षीय नेत्यांना टोला

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

राज दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या वेळी राज यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांना टोला लगावला.

मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईत एक मोर्चा निघाला होता. या मोर्चाला सर्व पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व नेते या मोर्चाला गेले होते. मग, आरक्षण का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही सर्वांना मान्य आहे. ते रद्द केलं गेलं. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारांना मान्य आहेत, तर अडतंय कुठं.

कोर्टामध्ये तुमची बाजू प्रभावीपणे मांडली का जात नाही? सर्वांना एकदा व्यासपीठावर आणा, त्यांना विचारा तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? असं ठाकरे म्हणाले.

कोण कुणाचा शत्रू, कोण कुणाचा मित्र ?

सध्या कळत नाही, की कोण कुणाचा शत्रू आहे अन् कोण कुणाचा मित्र. नेते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील हे सांगता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला होता. तसेच पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राज यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

केंद्र-राज्य ढकलताहेत परस्परांवर जबाबदारी

मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली करत आहे. हे लोकांनी पाहणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांना या प्रश्नांनी उत्तरं विचारली गेली पाहिजे.

तुम्हा सर्वांचे या मुद्द्यावर एकमत आहे, तर मग नेमकं घोडं पेंड कुठं खातंय. नेते केवळ मतदानासाठी लोकांकडे जातात आणि निवडणूक झालं की तोंड फिरवतात, असा करून चालणार नाही.

लोकांनी राजकीय नेत्यांना जाब विचारायला हवा. केवळ लोकांची माथी भडकवण्याचा तुमचा उद्देश आहे का? असा खरमरीत सवाल राज यांनी केला आहे.