महाबळेश्वरमध्ये यंदा २२ व २३ जुलै रोजी एका दिवसात पडलेला पाऊस हा गेल्या सव्वाशे वर्षातील विक्रमी पाऊस ठरला आहे. 1896 नंतर प्रथमच जादा पावसाचा विक्रम मोडून नवीन विक्रम नोंदविला गेला.

दोन दिवसांत नवीन विक्रम

२२ जुलै रोजी महाबळेश्वर येथे ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ५९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी पावसाची विक्रमी नोंद होती.

जुलै महिन्यातील २४ तासांत पडलेला हा आजवरचा विक्रमी पाऊस होता. यंदा २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे.

१८९६ मध्ये विक्रमी पाऊस

हवामान विभागाकडे १८९६ पासून पावसाच्या नोंदी आढळून येतात. त्यानुसार जुलै महिन्यात १८९६ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पाऊस ४८६६.९ मिमी पाऊस पडला होता.

यंदा आतापर्यंत एक जूनपासून महाबळेश्वरमध्ये ४०३० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा जून मध्ये १२८९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत जुलै महिन्यात २८४१ मिमी पाऊस झाला आहे.

आठ दिवसात २१०० मिलीमीटर पाऊस

हवामान विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो. यंदा गेल्या १९ जुलैपासूनच केवळ आठ दिवसात २१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिमेकडील वा-याचा जोर वाढला. त्या वेळी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचा परिणाम होऊन बाष्प घेऊन येणारे ढग महाबळेश्वरच्या डोंगररांगांना धडकून ते वर जात होते.

एकाच जागी हे ढग तयार झाल्याने महाबळेश्वरला कमी वेळेत अधिक पाऊस झाला. महाबळेश्वरप्रमाणेच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी ही परिस्थिती होती; मात्र त्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला गेला नसल्याने त्याची नोंद होऊ शकली नाही. यामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळणे अशा घटना घडल्या.