राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जुलै महिन्यापर्यंतची सरासरी ओलांडली आहे. राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाल्याने सरासरीपेक्षा २५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

चिंता मिटली

जुलैच्या पहिल्या ८-१० दिवसांत पावसाने दडी मारल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर राज्यात सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

मराठवाडा आणि कोकण विभागात सरासरीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकणात दर वर्षी जुलैपर्यंत १,६५५ मिलिमीटर पाऊस पडतो.

Advertisement

यंदा २३६०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही जुलै अखेरपर्यंत सरासरी २९६.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी तेथे ४२३.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत पाऊस चांगला झाल्याने सरासरीपेक्षा ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

दर वर्षी मध्य महाराष्ट्रात सरासरी ३७२.८ मिलिमीटरच्या सुमारास पावसाची नोंद केली जाते. यंदा त्यात वाढ होऊन ४६६.३ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

विदर्भात थोडा जास्त पाऊस

मुंबई भागात पावसाचे प्रमाण वाढले असून, २५.७ टक्के अधिक पाऊस झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विदर्भातही पावसात वाढ झाली असली, तरी त्याचे प्रमाण केवळ पाच टक्के असून, यंदा संपूर्ण विदर्भात ४७०.१ मिमी पाऊस झाला असल्याचे दिसून आले आहे.

बहुतांश भागांत पावसाने सरासरी ओलांडल्याने धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांतून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.

Advertisement

पुण्यातही पावसाने सरासरी ओलांडली

पुणे शहराचा विचार केला, तर आतापर्यंत ३३७.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सरासरीचा विचार केला, तर दर वर्षी शहरात ३२४.७ मिमी पावसाची नोंद केली जाते. यंदाच्या पावसाने सरासरीपेक्षा ३.८ टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे.

 

Advertisement