Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महापालिका निवडणुकीसाठी राज पुण्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदनिशी उतरण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांनी नाशिकनंतर पुण्याचा दाैरा सुरू केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्यासाठी राज तीन दिवस पुण्यात ठाण मांडणार आहेत.

दौरा महत्तवपूर्ण

तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये राज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, राज्य उपाध्यक्ष, राज्य सचिव यांच्यासोबतच प्रभाग अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याही बैठका घेणार आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांमध्ये काय चर्चा होणार, त्यावर निवडणुकीच्या अनुषंगाने, पक्ष संघटना बांधणीसाठी काय आराखडे तयार केले जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Advertisement

मनसेचे नेते, राज्य उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठक आज झाल्यानंतर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि त्यानंतर प्रभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बैठका राज घेणार आहेत.

मनविसेच्या बैठकीकडेही लक्ष

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सोडून आदित्य शिरोडकर यांनी गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून मनविसेला सावरण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

नाशिक दौऱ्यानंतर मिशन पुणे

नाशिक दौरा आटोपून राज सोमवारपासून पुणे दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज यांची झालेली 15 मिनिटांची चर्चा सर्वत्र उत्सुकतेचा विषय ठरली होती.

Advertisement

राज नाशिकमध्ये आहेत, मीही नाशिकमध्येच आहे. आमच्या वेळा जुळल्या तर राज यांच्यासोबत एक कप चहा घ्यायला काहीच हरकत नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर लगेचच या दोन्ही नेत्यांच्या वेळाही जुळल्याचं दिसलं.

 

Advertisement
Leave a comment