पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. आणि अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली पुढील राजकीय रणनीती आखताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी (raj thackeray) पुण्याचं दौरा केला होता. मात्र, आता पुण्यात (Pune) मनसे 3500 राजदूत (Rajdut) नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे (MNS) पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुणे शहराचे (Pune) मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरातील विविध भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

त्यानुसार पुण्यात मनसे संघटनात्मक पातळीवर विभागनिहाय नेमणुका करणार आहे. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल.

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती साईनाथ बाबर यांनी दिली आहे.

मनसेच्या स्थापनेपासूनच ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुण्यात पहिल्या प्रयत्नातच मनसेचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आले होते. रमेश वांजळे यांच्या रूपाने एक आमदारही निवडून आला होता.

त्यामुळे पुण्याकडून ठाकरे यांना कायमच अपेक्षा असतात. त्यामुळेच येत्या महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ठाकरे यांचे पुण्यात वाढलेले दौरे आणि आता राजदूत नेमण्याची कल्पना पुण्यातच राबविण्यात येत आहे.

राज ठाकरे यांचं पुण्यात राजदूत नेमणं हे आगामी महापालिका निवडणुकांसाठीचं पहिलं पाऊल आहे. त्यापाठोपाठ मनसेला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी देखील तयारी करायची आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणांच्या मनात जास्त आकर्षण आहे.