मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली आहे. राज यांनी फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर जाऊन ही भेट घेतली आहे. सध्या या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेमकं भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. 

मात्र, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या गणेशोत्सव येत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत.

त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सागरवर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. असं देखील सांगण्यात येत आहे.

शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेणारे राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून नुकतंच ते पुण्यात सभासद नोंदणीसाठी पोहोचले होते.

या नंतर राज ठाकरे सोमवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय निवास्थानी पोहोचले होते. दरम्यान, तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहेत.

राज ठाकरे आज सकाळी 8 वाजता सागर बंगल्यावर आले होते. त्याची गंधवार्ता कुणालाही नव्हती. राज ठाकरे यांनी अचानक ही भेट घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात झाली होत भेट…

याआधी जुलै महिन्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर पोहोचले होते. राज ठाकरेंवर त्यावेळी नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.