मुंबई – दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे आणि शिंदे गटातली (Shinde Group) पुढची लढाई सुरु झाली असून, ही लढाई शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे. शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली असून, यामध्ये आता दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाने आपला गटच शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचं यावरून आता नवा वाद पाहायला मिळत आहे. मात्र, अश्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानंतर वेगवगेळ्या स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनाही प्रसारमाध्यमांना तसेच समाजमाध्यमांवरुन टीका टीप्पणी केली आहे. मात्र हे पक्षाध्यक्ष असणाऱ्या राज ठाकरेंना (raj thackeray) फारसं रुचलेलं नाही.

त्यामुळेच त्यांनी समाजमाध्यमांवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना एक आवाहन केलं आहे. राज यांनी या संदर्भातील एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राज ठाकरेंनी (raj thackeray) रविवारी रात्री आठ वाजल्यानंतर समाजमाध्यमांवरुन एक पोस्ट केली. यामध्ये राज यांनी, “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये, “असं म्हटलं आहे.

तसेच, “मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन..,” असंही राज यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल होता आहे.