Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राज ठाकरे म्हणतात, ‘लाॅकडाऊन आवडे सरकारला’!

तिसरी लाट येणार म्हणून आतापासूनच घाबरून घरात बसायचं का? असा सवाल करतानाच ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

तिसरी लाट येईल, म्हणून घरात बसायचं का ?

तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून घरामध्ये बसायचं ही कुठली पद्धत आहे, असा सवाल करून राज म्हणाले, की लोकांचे उद्योगधंदे बरबाद झाले आहेत.

लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. घरं कशी चालवायची कळत नाही, मुलांच्या फी कशा भरायच्या, तेही समजत नाही. यांना काय जातं लॉकडाऊन करायचा आणि यांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत.

पी. साईनाथ यांचं पुस्तक होतं. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ तसं हे ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’, असा टोला राज यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवली नाही

या वेळी त्यांना भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता.

मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही.

त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव.

मला नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज म्हणाले.

बैल मुतल्यासारखा विचार करत नाही

राज यांनी परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट केली, तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या?

माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत. बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार करत नाही मी.

माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या, त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत.

त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं ते म्हणाले.

 

Leave a comment