पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. आणि अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली पुढील राजकीय रणनीती आखताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी (raj thackeray) पुण्याचं दौरा केला होता. मात्र, आता पुण्यात (Pune) मनसे 3500 राजदूत (Rajdut) नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे (MNS) पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुणे शहराचे (Pune) मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरातील विविध भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे शहरात राजदूत नेमणार असल्याची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज ठाकरे (raj thackeray) डिसेंबर महिन्यात पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुण्यात मनसेच्या गोटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. शहरातील प्रत्येक वार्डात राजदुतांच्या नेमणुकीसाठी चाचपणी सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे.

कारण राजदुतांच्या नेमणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: या सर्व राजदुतांना मार्गदर्शन करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे येत्या डिसेंबर महिन्यात पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत.

ते 10 डिसेंबरला कदाचित आपल्या सर्व राजदुतांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. ते या राजदुतांचा मेळावा घेणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पक्षाचे सचिव आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची सविस्तर माहिती समजू शकलेली नव्हती.

पण राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

राज ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतल्यानंतर पुण्यात हालचालींना वेग आला. पुण्याचे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरात 3500 राजदूत नेमण्याबाबत इतर पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.