गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. आता त्यांचा मुलगा पुष्कराजला दहावीच्या परीक्षेत 98.33 टक्के गुण मिळाले.

त्यात पुष्कराज राजीव सातव याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत अभिनंदन केलं.

पुष्कराजचं शिक्षण पुण्यात

पुष्कराज हा पुण्यातल्या बिशप स्कूलचा विद्यार्थी आहे. राजीव सातव यांचं पुण्यात निधन झालं. त्यानंतर कुटुंबाला खडतर वेळेचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही पुष्कराजनं मिळवलेलं शैक्षणिक यश कौतुकास्पद आहे.

सुळे यांनी काय म्हटलं ?

सुप्रिया सुळे ट्वीटमध्ये म्हटलं, की राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खूप आनंद झाला असता.

राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९८.३३ टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खूप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो.

पुष्कराजला 4 विषयात पैकीच्या पैकी

पुष्कराज राजीव सातवची गुणपत्रिकाही पाहण्यासारखी आहे. जे विषय आपल्याकडे अवघड, बोजड समजले जातात त्यात त्यानं पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.

इंग्रजी भाषा- 90, इंग्रजी साहित्य- 100, हिंदी- 99, इतिहास आणि नागरिकशास्त्र- 98, भूगोल- 100, कमर्शिअल स्टडिज-100, अर्थशास्त्र 100, संगणक अॅप्लिकेशन्स- 97 असे गुण त्याला मिळाले आहेत.

याचाच अर्थ असा की, पुष्कराजनं चार विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे. हिंदीसारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या भाषा विषयातही त्यानं 99 गुण मिळविले.

प्रियंका गांधींचीही भेट

अलिकडेच म्हणजेच 22 जुलैला प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पुष्कराजही प्रज्ञा सातव यांच्यासोबत होता.

त्यांच्या भेटीचा फोटोही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होता. प्रज्ञा सातव या राजकीय भूमिकेत दिसणार की काय अशीही चर्चा सुरू झाली होती.

अजून तरी प्रज्ञा सातव यांनी प्रियंका गांधीसोबतच्या भेटीबद्दल काही बोलल्या नाहीत. त्यानंतर आता पुष्कराजनं मिळवलेल्या यशाची चर्चा होतं.

कोण होते राजीव सातव ?

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार होते. त्यांना कोरोना झाला आणि पुण्यात ते जवळपास महिनाभर कोरोनाशी झुंज देत होते. अखेर त्यांचं 16 मे रोजी निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते.

हिंगोलीतूनही ते लोकसभेवर निवडून गेले होते. अवघ्या 46 व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुष्कराजनं आणलेलं सकारात्मक यश कौतुकास्पद आहे.