दादासाहेब फाळके चित्रनगरीत भाजपचे आमदार राम कदम यांचे गुंडाराज सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केला असून, त्याची अनेक उदाहरणे देताना कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांचा बळीही या गुंडाराजने घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.

राम कदम यांना अटक करण्याची मागणी

आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज सुरू आहे. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर कदम यांना ताबडतोब अटक केली पाहिजे’, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. संपूर्ण घटनाक्रम सांगत चव्हाण यांनी गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू आहे याचे दाखले दिले.

Advertisement

४५ हजार कामगार वेठीस

साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे ४५ हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे.

टाळेबंदीच्या काळात सलमान खान, यशराज फिल्म्स आणि इतर काही निर्मिती संस्थांनी कामगारांसाठी ५० कोटी रुपये मदत म्हणून दिले होते; मात्र संबंधित संघटनेने त्यातील दोन कोटी रुपयेदेखील गरीब कामगारांना मिळू दिले नाहीत.

गोरेगावची संपूर्ण चित्रनगरी या लोकांनी काबीज केली असून तिथे गुंडाराज चालले आहे. या सर्वांचे नेतृत्व राम कदम करत असून त्यांना ताबडतोब अटक झाली तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल’, असे चव्हाण म्हणाल्या.

Advertisement

कदम अध्यक्ष झाल्यापासून दादागिरी

नृत्य, अॅक्शन, म्युझिक अशा विविध क्राफ्टची ही युनियन आहे. २०१५ मध्ये राम कदम या संघटनेचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून राकेश मौर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अम्रिश श्रीवास्तव, अशोक दुबे, बी.एन. तिवारी, दीपक श्रीवास्तव यांची गोरेगाव चित्रनगरी येथे दादागिरी सुरू झाली आहे.

कदम यांनी वेळोवेळी आपलं राजकीय वजन वापरून या गुंडांना वाचवलं आहे. या सर्वांचे कायदेशीर सल्लागार हे किरीट सोमय्या असून या गुंडांची गुन्ह्याची प्रकरणे दाबून टाकण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात गृहखात्याचा गैरवापर केला गेल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला.

गुंडांना कदम यांचं पाठबळ

या संघटनेशी माझा आता काहीही संबंध नाही, असे राम कदम सांगत असले, तरी चित्रनगरीतील गुंडांना कदम यांचंच पाठबळ असून साप्ते यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर कदम यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

Advertisement

साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असं लिहिलं आहे. ही बाब मन हेलावून टाकणारी असून चित्रनगरीतील गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

 

Advertisement