File Photo

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे व कपिल पाटील यांचा समावेश करून भाजपने शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, तळकोकण आणि उत्तर कोकणाला न्याय देण्यापेक्षा या दोन्ही भागातील शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी केलेली ही खेळी असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या आठ होणार

मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरी दोन मंत्रिपदं जवळपास निश्चित झाली आहे. खासदार नारायण राणे आणि कपिल पाटील यांना दिल्लीवरुन तातडीनं फोन आल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल हे तीन केंद्रीय मंत्रिपद सांभाळत आहेत. तसेच, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि रावसाहेब दानवे हे तिघे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सध्या महाराष्ट्रात सहा केंद्रीय मंत्रिपदं आहेत. यामध्ये आणखी दोन मंत्रिपदाची भर पडणार हे निश्चित झालं आहे. राणे आणि पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार की राज्यमंत्रिपदाची जबाबदारी, हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच समोर येईल.

महापालिका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार

राणे आणि पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास महाराष्ट्रात शिवसेनेविरोधात भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता मानली जाते.

Advertisement

पाटील यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. आगामी काळात होणाऱ्या मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दृष्टीने या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं बोललं जात आहे.

नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा होत होती; मात्र यांना अद्याप दिल्लीवरुन बोलवणं आल्याची कोणतीही माहिती नाही.

Advertisement