शिवसेना आणि नारायण राणे म्हटले, की काही वर्षापासून सातत्याने राडा आणि संघर्ष असेच स्वरुप असते; परंतु कोकणात झालेल्या एका कार्यक्रमत शिवसेना आणि राणे कुटुंबीय एकत्र आले होते.

विशेष म्हणजे राणे यांनी दिल्लीतून या कार्यक्रमात आभासी उपस्थिती लावून नांदा साैख्य भरेचा आशीर्वाद दिला.

राजकीय हवामानात बदल

कोकणात आता राजकीय हवामान बदलताना दिसतेय. वेंगुर्ल्यातल्या एका कार्यक्रमात शिवसेना नेते आणि राणे एकत्र आले होते.

Advertisement

हा कार्यक्रम होता सागररत्न मत्स बाजारपेठेच्या लोकार्पणाचा. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आ. नितेश राणे, खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही होते.

याच कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेही आॅनलाईन सहभागी झाले.

शिव्याशाप देणारे मांडीला मांडी लावून

एकमेकांना एकेरीवर बोलणारे, प्रसंगी राडा करणारे, जाहीर शिव्याशाप देणारे, राणे, राऊत ही मंडळी एकाच व्यासपीठावर पाहून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे; पण राणे- राऊतांनी जी फटकेबाजी केली, त्यामुळे तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची सुरुवात कोकणातूनच झाली, की काय असा सवाल विचारला जातोय.

Advertisement

काय म्हणाले नितेश राणे ?

या कार्यक्रमात नितेश राणे एकदम मोकळं, थेट आणि खुलून बोलले. ते म्हणाले, -‘राज्यभरात यूतीची चर्चा होतेय. हल्ली यूतीची चर्चा बंद झाली होती; पण आजचं हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीची आशा करणारे आमचे असंख्य चाहते सुखावले असतील आणि रात्री चांगले झोपतील एवढंच सांगतो.

कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणाबरोबरही एकत्र येण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु’.

राऊतांनी राणेंचा थोपटला खांदा

राऊत यांनी चक्क नितेश राणेंचा खांदा थोपटला. नंतर ते स्वत: भाषणाला उभे राहिले. ते म्हणाले,-आमदार आणि माझे मित्र नितेशजी राणे (राऊतांच्या ह्या वक्तव्यावर सभागृहात हसू) .

Advertisement

नाही हसू नका आम्ही आहोत मित्र. आता त्यांचं भाषण झालं आणि आम्ही एकमेकांना काँग्रॅटस केलं. नाही माणूस विचाराचा श्रीमंत असला पाहिजे’.

साखरेत घोळण्याचा प्रयत्न

एकमेकांना साखरेत घोळण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळं कोकणातलच नाही तर मुंबईतीलही राजकारण बदलू शकतं.

हे बदललेलं वातावरण शिवसेना-भाजपला युतीपर्यंत घेऊन जाणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल

Advertisement