Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

माजी सभापतींसह पाच जणांविरोधात खंडणीचा गुन्हा

हवेली तालुक्यात एका शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन परस्पर सहा कोटी ७५ लाख रुपये काढून घेत बोजा कमी करण्यासाठी पुन्हा एक कोटी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आरोपी

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे.

गुन्हा दाखल केलेल्यामध्ये संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी आदींचा समावेश आहे. याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Advertisement

काय घडले?

२०१३ मध्ये फिर्यादी गंगाराम सावळा मासाळकर यांच्या मालकीच्या मौजे वढू खुर्द, (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर या जमिनीचे गहाणखत आपसात संगनमताने करण्यासाठी मंगलदास बांदल, संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांनी फिर्यादीला त्यांच्या चारचाकी मोटारीमध्ये डांबून ठेवले.

दमदाटी केली. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने करून एकूण सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये परस्पर काढून घेतले. जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली.

संबंधित व्यक्तींचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यास कुटुंबीयांना त्रास देतील म्हणून फिर्यादीने आतापर्यंत तक्रार दिलेली नव्हती; परंतु अदयापपर्यंत जमिनीवरील बोझा कमी केला नाही, म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Advertisement

बांदलाविरुद्ध पूर्वीचेही गुन्हे

दरम्यान, शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूरात दत्तात्रेय मांढरे यांच्या अशाच फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदलसह इतरांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर आणखी दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल झाल्याने बांदलसह इतर साथीदारांच्या अडचणीतही वाढ झाली आहे

 

Advertisement
Leave a comment