सुमारे ४५० हून अधिक तेलुगु चित्रपटांच्या काचेच्या स्लाइडचा दुर्मीळ खजिना नुकताच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट झाला आहे. त्यात १९३९ ते १९५५ काळातील चित्रपटांच्या स्लाइडचा समावेश आहे. या स्लाइड चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील चित्रफिती आहेत.

चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तावेज

दोन पातळ काचांमध्ये चित्रफीत पॉझिटिव्ह दाबून, या काचेच्या स्लाइड तयार केल्या जात असत. त्याकाळी एखादा नवा चित्रपट येणार असल्यास त्याची घोषणा करण्यासाठी किंवा जाहिरातीसाठी याचा वापर होत असे.

चित्रपटाच्या मध्यंतरात किंवा चित्रपट सुरू होण्यापूर्वी थिएटरमध्ये या स्लाइड दाखवल्या जात होत्या. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘‘चित्रपटाच्या काचेच्या स्लाइड म्हणजे भारतीय चित्रपट परंपरेचा वैभवशाली दस्तावेज आहे.

Advertisement

वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या काळात हा ऐतिहासिक खजिना एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडणे, अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाचा शोध म्हणता येईल.

त्या काळात ‘फिल्म पॉझिटिव्ह’ या स्लाइड तयार करण्यासाठी वापरल्या जात होत्या. या स्लाइड म्हणजे चित्रपटाचे पोस्टर्स किंवा इतर प्रचार आणि जाहिरातीचेच लघुरूप आहे.’’

दोन हजारपेक्षा अधिक काचेच्या स्लाइड

चित्रपटसृष्टीचे संशोधन करणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. संग्रहालयातर्फे लवकरच हे डिजिटल स्वरूपात आणले जाईल, असे संग्रहालयाच्या दस्तावेज विभागाच्या प्रभारी आरती कारखानीस यांनी सांगितले. राष्ट्रीय संग्रहालयात हिंदी, गुजराती आणि तेलुगु भाषेतील दोन हजारपेक्षा अधिक काचेच्या स्लाइड आहेत.

Advertisement

प्रमुख तेलुगू चित्रपट

  • वाय. व्ही. राव यांचा विधवा पुनर्विवाहावर आधारित गाजलेला सामाजिक चित्रपट ‘मल्ली पेल्ली’ (१९३९).
  • बी. एन. रेड्डी यांचा ‘वंदे मातरम्’ (१९३९), चित्तोड व्ही. नागय्या यांनी सुरुवात असलेला ‘किलु गुरर्म’ (१९४९)
  • एन. टी. रामाराव यांचा ‘दासी’ (१९५२)
  • शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ चित्रपटाची तेलुगू आवृत्ती राघवय्या यांचा ‘देवदासु’ (१९५३)

 

 

Advertisement