ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

रवींद्र ब-हाटेच्या सहका-याला अटक

पुणे: बांधकाम व्यावसायिक तसेच अन्य लोकांना धमकी देऊन, त्यांची मालमत्ता आपल्या नावावर करून घेणा-या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे याच्यापर्यंत पोलिस पोहोचू शकले नसले, तरी त्याच्या साथीदाराला मात्र अटक करण्यात आली आहे.

ब-हाटे अनेक महिने फरार

बऱ्हाटे हा गेल्या काही महिन्यांपासून फरार असून पोलिसांनी त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतरही तो अद्याप हाती लागू शकला नाही.

त्याच्याबरोबरच फरार असलेल्या व मोक्का कारवाई केलेला प्रशांत पुरुषोत्तम जोशी याला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

रवींद्र ब-हाटे, देवेंद्र जैन, शैलेश जगताप, संजय भोकरे, प्रेमचंद बाफना यांच्यासह अनेकांनी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीच्या पर्वती येथील जमिनीचा व्यवहार करून त्यांची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यामध्ये मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे.

जोशीही देत होता पोलिसांच्या हातावर तुरी

या गुन्ह्यातील रवींद्र ब-हाटेचा साथीदार प्रशांत जोशी हाही अनेक महिने फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील पोलिस अंमलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना प्रशांत जोशी हा त्याच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गांधी भवन येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यावरुन पोलिसांनी त्या भागात सापळा लावला होता. प्रशांत जोशी तेथे असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यापूर्वी या गुन्ह्यातील प्रकाश रघुनाथ फाले (वय ४१, रा. सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. विशाल तोत्रे हा मार्च महिन्यात मरण पावला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

You might also like
2 li