फसवणूक व अन्य प्रकारांत गुन्हे दाखल असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे गेल्या दीड वर्षापासून फरार आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या कुटुंबीयांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या काही नातेवाइकांनाही ताब्यात घेतले आहे.
पाच दिवसांची कोठडी
बऱ्हाटे याच्या पत्नीपाठोपाठ गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मयूर रवींद्र बऱ्हाटे (वय २१, रा. धनकवडी) याला उशिरा अटक केली आहे.
दरम्यान, काल अटक केलल्या बऱ्हाटे याची पत्नी संगीता बऱ्हाटे आणि पितांबर धिवार यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या पथकाला हाती लागल्यानंतर मयूरला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात त्याला आणून चौकशी करण्यात आली. त्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
कुटुंबीयांचाही गुन्ह्यांत सहभाग
रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या दीड वर्षापासून फरार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याचे व त्याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेने पितांबर धिवार याला अटक केली होती.
तसेच गुन्ह्यात सहकार्य केल्याने व त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने बऱ्हाटे यांची पत्नी संगीता बऱ्हाटे हिलाही अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांची ५ दिवस पोलिस कोठडी मंजूर केली आहे.