Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रिझर्व्ह बँकेची आणखी एका बँकेवर कारवाई

रिझर्व्ह बँकेने नियमभंग करणा-या बँकांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. गेल्या आठवडयात तीन बँकांवर कारवाई केल्यानंतर आता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सूचना देऊनही निष्काळजीपणा

प्राथमिक माहितीनुसार, पंजाब अँड सिंध बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन केले नाही.

16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत सूचित करण्यात आले होते; मात्र त्यानंतरही बँकेने निष्काळजीपणा सुरू ठेवल्याने रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारणे द्या नोटीसही बजावण्यात आली आहे.

चार बँकांवर कारवाईचा बडगा

रिझर्व्ह बँकेने इटावा येथील नगर सहकारी बँकेवरही दंडात्मक कारवाई केली. या बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेनेही नियमांची पायमल्ली केल्याच ठपका रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे.

यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगाविरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

 

Leave a comment