Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

खुनाला दोन वर्षांनी फुटली वाचा

कायद्याचे हात लांब असतात असं म्हणतात. गुन्हा केला, तर आरोपी काही ना काही बाबी मागं सोडतात. पोलिस सुतावरून स्वर्ग गाठतात. तसाच प्रकार पिंपरीत घडला. दोन वर्षांनंतर खुनाला वाचा फुटली.

अपहरण करून खून

प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी चार जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला.

पुरावा नष्ट करण्यासाठी मृत व्यक्तीचे कपडे काढून मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३१ जुलै २०१९ ला कोन्हे फाटा (ता. मावळः येथे घडली.

हे आरोपी

धीरज मायराम नागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सूरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (वय ३५, रा. गांधी नगर झोपडपट्टी देहूरोड), अरिफ सिद्दीक शेख (वय ३२, रा. पडवळ नगर, थेरगाव), सागर सुरेश जगताप (वय ३०, रा. थेरगाव), चेतक नेपाळी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

असा केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शेख याच्या प्रेयसीला धीरज यांचा मित्र दुर्गा साळवी याने पळवून नेले.

या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून दुर्गा साळवी याचा मुंबई येथील पत्ता माहिती करून घेण्यासाठी धीरज याचे ३१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता कान्हेगाव रेल्वे स्टेशन समोरून अपहरण केले.

त्यानंतर मुळा नदीच्या पात्राजवळ वाकड येथे असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून धीरज यांना मारहाण केली. सूरज याने धीरज यांचे पाय पकडले. सागर आणि चेतक यांनी हात पकडले. त्यानंतर सूरज याने धीरजचा गळा आवळून खून केला.

धीरजची ओळख पटू नये, यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे सर्व कपडे काढून मृतदेह एका पोत्यात घालून पोत्याचे तोंड बंद न करता मुळा नदीच्या पात्रात वाकड येथे टाकून दिले.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी सूरज जगताप याला ताब्यात घेतले आहे.

Leave a comment