आतापर्यंत कांद्याला अपेक्षेइतका भाव मिळत नव्हता. कोरोनामुळे लागू असलेली टाळेबंदी हेच त्याचे कारण होते; परंतु आता व्यवहार सुरळीत झाल्याने कांद्याला मागणी आणि भावही वाढायला लागले आहेत.

लोणी (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यास या हंगामातील विक्रमी प्रतिदहा किलो २२५ रुपये बाजारभाव मिळाला, तर खुल्या मोकळ्या कांद्यास प्रतिदहा किलोला १६९ रुपये बाजारभाव मिळाला असल्याची माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

शिरूर तालुक्यातूनही आवक

आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग व शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतक-यांना येथील उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणणे सोयीचे पडत आहे. येथे विक्री होणा-या कांद्यास बाजारभावही चांगला मिळत आहे. त्यामुळे येथील कांदा लिलावाला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आज येथे एकूण ६११ पिशवी कांदा व दोन ट्रॅक्टर ट्राॅली खुला कांद्याची आवक झाली.

Advertisement

भाव असे

एक नंबर कांद्याला २०१ ते २२५ रुपये, दोन नंबर कांद्यास १७० ते २०० रुपये, तीन नंबर गोलटी कांद्यास १०० ते १४० रूपये व चार नंबर बदला कांद्यास ४० ते ७६ रुपये प्रतिदहा किलो बाजारभाव मिळाला. सभापती देवदत्त निकम यांच्या स्वताच्या शेतातील विक्रीसाठी आलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रोली खुला कांद्यास प्रती १० किलोस १६९ रुपये बाजारभाव मिळाला.

कांदा लिलावामध्ये खरेदीदार व्यापारी मचिंद्र वाळुंज, महेंद्र वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज, दत्तात्रय नरवडे, प्रदीप कोचर, सचिन टेमकर यांनी भाग घेतला तर लिलावाची व्यवस्था उपबजार कार्यालय प्रमुख अशोक राजापरे, गणेश गावडे यांनी पाहिली.

Advertisement