नवी मुंबई: गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किंमती सातत्यानं वाढत होत्या. किंमती दुप्पट झाल्यानं गृहिणीचं बजेट कोलमडून पडलं होतं; परंतु आता किलोमागं तीस रुपयांनी किंमती कमी झाल्यानं वाढत्या महागाईत गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आयात वाढल्यानं भावात घट
देशात खाद्यतेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत होता. हीच बाब ओळखून केंद्र सरकारने खाद्य तेलाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये तेलांच्या किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घसरण झाली आहे.
किमती अजून कमी होणार
भारतात साठ टक्के खाद्यतेल आयात केले जाते, तर ४० टक्के तेल भारतात तयार होते. कोरोनाकाळात बाहेरगावी होणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने तेलाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. शिवाय भारतात तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात असते.
त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने तेलाच्या किमती जवळपास ४० टक्क्यांनी वाढल्या होत्या. मात्र, आता तेलाचे उत्पादन वाढले असून केंद्र सरकारने तेल्याच्या आयातीवरील आयात शुक्ल कमी केल्याने खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
तर सध्या तेलाच्या दरात यापेक्षा पाच ते दहा रुपये अजून कमी होण्याची शक्यता असल्याचे तेलाचे घाऊक व्यापारी महेश गेडे यांनी सांगितले.
काय आहेत तेलाचे भाव?
सद्यस्थितीत सरकी तेलाचे बाजारभाव स्थिर असून शेंगदाणा तेल प्रतिकिलो १८० वरून १५० रुपयांवर आले आहे.
सूर्यफूल तेल प्रतिकिलो १७० रुपयांवरून १४० रुपये झाले, सोयाबीन तेल प्रतिकिलो १६० रुपयांवरून १३० रुपये झाले तर पाम तेलाचे भाव पूर्वीप्रमाणेच आहेत.
आयात शुक्ल घटवले
सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रतिटन आठ हजार रुपयांची कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क प्रतिटन ८६ डॉलर्सनी कमी करण्यात आले आहे. क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कातदेखील सरकारने प्रतिटन ३७ डॉलरची कपात केली आहे, तर पाम तेलावरील आयात शुल्क प्रतिटन ११२ डॉलर्सनी घटवण्यात आले आहे.