एका महिलेने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर धमकीचे आणि छळाचे आरोप केले असून, या प्रकरणी दाखल झालेल्या तीनही याचिकांवरीसल सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली. याचिकांवरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला.

काय आहेत आरोप ?

राऊत यांनी आपला छळ केला. जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप या महिलेने केला आहे. त्याबाबतच्या याचिकेची सुनावणी न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठात पूर्ण झाली.

न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. या महिलेचा राऊत आणि तिच्या पतीविरोधातही आरोप आहे. राऊत आणि माझे पती सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून काही व्यक्तींनी छळवणूक केली.

वाकोला आणि माहीम पोलिस ठाण्यात वारंवार फिर्याद देऊनही पोलिसांनी दखल घेतली नाही, असा या महिलेचा आरोप आहे.

राऊत यांच्याकडून खंडन

पोलिस काहीच करीत नसल्यानं या महिलेनं अॅड. आभा सिंग यांच्यामार्फत तीन याचिका दाखल केल्या. राऊत यांनी ज्येष्ठ वकील अॅड. प्रसाद ढाकेफाळकर यांच्यामार्फत म्हणणे मांडले. त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले.

‘पोलिसांनी एका प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून दोन प्रकरणांत ए-समरी अहवाल दाखल केले आहेत, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी खंडपीठाला दिली.

प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी

पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी विनंती महिलेतर्फे आभा सिंग यांनी केली.

तेव्हा, ‘प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या विचाराधीन आहे आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम १६४ अन्वये तुमचा जबाबही नोंदवण्यात आलेला आहे.

मग ते न्यायालय योग्य निर्णय देणार नाही, असे आम्ही गृहीत का धरायचे? दाद मागण्यासाठी न्यायालयांचा पदानुक्रम आहे.

कनिष्ठ न्यायालयात न्याय मिळाला नाही, तर तुम्हाला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग आहेच.

तुमच्या प्रकरणात आम्ही फार तर निर्णय लवकर देण्याची विनंती न्यायदंडाधिकारी न्यायालयाला करू शकतो’, असे खंडपीठाने त्यांना सांगितले. त्याविषयी आभा यांनी सहमती दर्शवल्यानंतर खंडपीठाने तिन्ही याचिकांवरील आपले निर्णय राखून ठेवले.

‘त्या’ याचिकेवर सोमवारी सुनावणी

या याचिकादार महिलेने बनावट पीएच.डी. पदवी मिळवली असल्याचा आरोप आहे. एका सामाजिक कार्यकर्तीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर नोंदवून तिला अटक केली.

मागील दीड महिन्यापासून ती अटकेत आहे. ‘राऊत यांच्याविरोधात याचिका केल्यानेच गंभीर कलमे लावून पोलिसांनी मला अटक केली’, असा दावा करत या महिलेने आणखी एक याचिका केली आहे.

‘संबंधित पदवी मला पतीनेच मिळवून दिली आणि आता त्यानेच त्या सामाजिक कार्यकर्तीला कागदपत्रे पुरवली’, असा आरोप महिलेने केला. त्यामुळे खंडपीठाने या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली.