पुणे महापालिकेवर अडीचशे टन कच-याच्या विल्हेवाटीची जबाबदारी

शहरात २३ गावं समाविष्ट झाल्यानं आता तिथं संकलित होणा-या वाढीव अडीचशे टन कच-याच्या विल्हेवाटीची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.

प्रकल्प उभारावे लागणार

शहराच्या हद्दीलगतची २३ गावं महापालिका हद्दीत आल्यानंतर आता या गावांच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्टेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.

या गावांमध्ये सुमारे २५० टन कचरा निर्माण होत असून, तो जिरविण्यासाठी महापालिकेला पायाभूत सुविधा आणि प्रकल्प उभारावे लागणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू झालं आहे.

१४०० टन क्षमतेचे नवीन प्रकल्प

पुणे महापालिका हद्दीत दररोज सरासरी २१०० टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. यामध्ये सुमारे १८५० टन कचरा संकलित केला जातो, १२० टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, तर सुमारे १५० टन कचरा निर्मितीच्या ठिकाणीच नष्ट केला जात आहे.

घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या १८५० टन कचऱ्यापैकी ७५० टन ओला तर ८०० टन सुका कचरा आहे. सुमारे २५० टन मिश्र कचरा आहे.

ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची दीड हजार टन इतकी क्षमता आहे; मात्र शहरातील कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे प्रकल्पांच्या ठिकाणी लागत आहेत.

महापालिका प्रशासनानं एक हजार चारशे टन क्षमतेचे नवे प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन केलं आहे; पण सद्यःस्थितीतील प्रकल्प हे ५० टक्के कमी क्षमतेनं सुरू आहेत.

कचरा जाळला जात असल्याने नागरिकांना त्रास

शहराच्या हद्दीलगतच्या गावांमध्ये कचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालेले नाही. ग्रामपंचायतींनी व्यवस्था केली असली, तरी मोठ्या प्रमाणात झालेली बांधकामं व अपुरी व्यवस्था यामुळे हा कचरा नदीपात्र, नाले, कालवा तसेच मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेनं अनेक जण टाकतात.

त्यामुळे या भागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. मोकळ्या जागेत कचरा न जिरवता तो थेट जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत आता या २३ गावांच्या कचऱ्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.

चार गावांत सर्वाधिक कचरा

नऱ्हे, कोंढवे-धावडे, वाघोली, मांजरी बुद्रुक या चार गावात सर्वाधिक १३६ टन कचरा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणचे व्यवस्थापन करताना महापालिकेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.