Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

राज्यातील निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता ,अनलाॅकच्या निकषांत बदल…

कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली, तरी डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळं कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक होवू शकतात. 

अनलाॅकच्या निकषांत बदल

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

सर्व जिल्हे तिस-या टप्प्यांत

राज्यातील रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं आढळून आलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं नवे आदेश काढले आहेत.

त्यानुसार, कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची संख्या काहीही असली, तरी यापुढं राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या स्तरावरच असल्याचं ग्राह्य धरलं जाणार आहे. पुढील आदेशानुसार ही स्थिती कायम राहणार आहे.

कठोर निर्बंधाचे स्थानिक स्तरावर अधिकार

स्थानिक प्रशासनाला आपापल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

परिस्थिती चिघळली

‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करताना राज्य सरकारनं यापूर्वी पाच स्तर ठरविले होते. त्यासाठी ४ जून रोजी आदेश काढण्यात आले होते. कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेच्या आधारे हे स्तर ठरविण्यात आले होते.

वेळोवेळी त्यात बदल केला जात होता. तेव्हापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्बंध बरेच शिथील झाले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती चिघळत चालली आहे.

कोरोनाचा विषाणू सतत रूप बदलत असल्यानं व अधिक घातक होत असल्यानं धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आधीच्या नियमावलीत बदल केले आहेत.

आरटी-पीसीआर चाचण्यांचेच अहवाल धरणार ग्राह्य

कोरोना पॉझिटिव्हीचा दर निश्चित करताना याआधी अँटिजन आणि आरटी-पीसीआर या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचे रिपोर्ट ग्राह्य धरले जात होते. आता यात बदल करण्यात आला आहे.

यापुढं कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर निश्चित करताना केवळ आरटी-पीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट ग्राह्य धरले जाणार आहेत. रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा अन्य चाचण्यांचा आधार त्यासाठी घेता येणार नाही.

Leave a comment