Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

डाळींच्या साठ्यांवरील निर्बंध सैल

पुणेः डाळींच्या साठ्यावर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला होता. केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यावरील निर्बंध शिथील केले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांना आता पाचशे टन डाळींचा साठा करण्याची मुभा देण्यात आली आहे.

जादा साठा करण्यास परवानगी

‘पुण्यासह देशातील विविध बाजारपेठांतील घाऊक डाळ व्यापाऱ्यांना दोनशे टन साठा करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच, डाळींच्या साठ्याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपडेट्स करण्याची सूचना करण्यात आली होती. या आदेशाला व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने नवीन निर्णय जारी केला असून, त्यानुसार डाळ व्यापारी पाचशे टन डाळींचा साठा करू शकतील.

Advertisement

एका डाळीचा दोनशे टन साठा

केंद्र सरकारने हरभरा डाळ, उडीद, तूर, मसूर या डाळींवर निर्बंध लावले होते. मूग डाळीला निर्बंधातून वगळण्यात आले होते,’ असे कॉन्फडेशरन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र बाठिया, सहसचिव रायकुमार नहार; तसेच ईश्वर नहार यांनी सांगितले.

नवीन आदेशानुसार व्यापारी पाचशे टन डाळींचा साठा करू शकतील. मात्र, हरभरा डाळ, उडीद, तूर, मसूर या प्रकारांपैकी कोणत्याही एका डाळीचा साठा दोनशे टनापेक्षा जास्त असता कामा नये. किरकोळ व्यापारी पाच टन डाळ साठा करू शकतील. डाळींच्या साठ्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक

‘केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’; तसेच राज्यातील विविध व्यापारी संघटनांकडून राज्यभर लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. व्यापारी विविध प्रकारचे कर भरतात. हे काम सर्व ऑनलाइन पद्धतीने करावे लागते. डाळ साठ्याबाबत दररोज व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या पोर्टलवर माहिती द्यावी लागणार आहे.

विक्री किती झाली; तसेच किती माल शिल्लक राहिला, याची माहिती दररोज पोर्टलवर द्यावी लागणार आहे. निर्बंधामुळे व्यापाऱ्यास वेळ कमी मिळत आहे. व्यापारावरही परिणाम झाला आहे. डाळींच्या साठ्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले असले, तरी दररोज पोर्टलवर माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे,’ असे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.

Advertisement
Leave a comment