पुणे शहरात करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आले असले, तरी अजून धोका कायम असल्याने निर्बंधांबाबत महापालिकेने सावध पावले टाकण्याचे धोरण अवलंबले आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या अनुषंगाने काढलेला आदेश पाहता पुणे महापालिका क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध यापुढेही कायम राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना निर्बंधमुक्तीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका पुणे शहराला बसला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सातत्याने पुणे शहर आणि जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या इतर भागांपेक्षा अधिक राहिली. सध्या पुण्यातील स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.
दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे; मात्र निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळण्याची सध्यातरी कोणतीच शक्यता नसल्याचे पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक संस्था बंदच
कोरोनाचा कायम असलेला प्रभाव आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राज्य शासनाकडून मर्यादित प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. त्याला अनुसरूनच सध्या पुण्यात कोविड प्रतिबंधक आदेश लागू आहे. या साखळीत १५ जुलै रोजी शेवटचा आदेश जारी करण्यात आला होता.
या आदेशाची मुदत आज संपत असल्याने पालिका आयुक्तांनी सुधारित आदेश जारी केला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग बंदच राहणार आहेत.
ऑनलाइन शिक्षणास मात्र मुभा असेल. हे आदेश पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू राहणार आहेत. पुढील आदेशापर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहेत.
शिथिलता देण्याचा प्रस्ताव
दरम्यान, करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेले व अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी असलेले जिल्हे आणि महापालिका क्षेत्रांमध्ये निर्बंधांत आणखी शिथिलता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्यास पुण्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.