राज्याच्या बुहुतांश ठिकाणी भात लावणीची कामे सुरू झाली आहेत. पुण्यातील जुन्नर, आंबेगावमधील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांनीही भात लागवडीच्या कामाला सुरुवात केली आहे.
जुन्नर-आंबेगावमध्ये कामे जोरात
फक्त कोकणातच नाही तर सर्वत्र भात लावणीची लगबग सुरू झाली आहे.पुण्यातील जुन्नर, आंबेगावमध्ये आदिवासी बांधवांनी भात लावणीच्या कामाला यंदा जोमात सुरुवात केली.
सुरुवातीला पावसाळा कमी असल्यामुळे भाताची रोपे ही विहिरीच्या पाण्यावर तयार करावी लागली. त्यामुळे भात रोपे लागवडीला उशीर झाला; पण तरीही ही रोपे बहरायला सुरुवात झाली आहे.
लागवड करण्यासाठी वेळीच पाऊस न आल्यामुळे भात लागवडीसाठी आदिवासी बांधवांना थांबावे लागले; पण गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचले. त्यामुळे भात लावणीसाठी सुरुवात झाली.
आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण
भात लावणीमुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव भात लावणी करताना, गाणी गाताना पाहायला मिळत आहेत.
संपूर्ण पश्चिम पट्ट्यातील भात शेतीवर आदिवासी कुटुंबातील लोक वर्षभर जिवंत राहतात. त्यामुळे आता भात लागवडीला सुरुवात झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे.
महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.