Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

रिंगरोडमुळे २५ प्रदूषणात २५ टक्के घट होणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडमुळे दररोज बाहेरून पुण्यात येणारी आणि पुण्यातून बाहेर जाणारी साठ ते सत्तर हजार वाहने कमी होतील. त्यामुळे शहरातील जवळपास २० ते २५ टक्क्यांनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

सत्तर हजार वाहने बाहेरून जाणार

कोल्हापूर, सासवड, सोलापूर, नगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरातून जावे लागते.

अशी दररोज सुमारे साठ ते सत्तर हजार वाहने आहेत. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर त्याचा ताण पडतो.

परिणामी, शहरात हवेचे व ध्वनीचे प्रदूषण वाढले आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे ही वाहने शहराच्या आत न आणता बाहेरच्या बाहेर योग्य त्या दिशेला वळवण्यासाठी या रिंगरोडचा उपयोग होणार आहे.

परिणामी, शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. अंतर कमी होऊन, प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची बचत होईल.

दोन्ही महापालिकेच्या क्षेत्रातील २० ते २५ टक्के वायू प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टोलला नाही

पुणे रिंग रोड या महामार्गावर १४ मल्टीलेव्हल इंटरचेंज, आठ मोठे ब्रीज, ४७ लहान ब्रीज,१८ व्हायडक्ट (रेल्वे किंवा रस्त्यांसाठी दरीवर बांधलेला लांबलचक पूल), १७ टनेल आणि ४ रोड ओव्हर ब्रीज बांधले जाणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांकडून कोणत्याही प्रकारचा टोल स्वीकारला जाणार नाही. पुणे रिंग रोडला ९ राष्ट्रीय महामार्ग, ४ राज्य महामार्ग, १ अर्बन आर्टेरियल रोड जोडले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सव्वीस हजार कोटींचा खर्च

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे पूर्व व पश्चिम असे दोन मार्ग तयार करण्यात येणार आहेत. हा महामार्ग १७३. ७ किलोमीटर एवढ्या लांबीचा असणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी जवळपास १५५४. ६४ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

तसेच अंदाजे २६ हजार ८३१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आठ पदरी रोड हा ३८ किलोमीटरचा असून, त्यात दोन पदरी सर्व्हिस रोड असणार आहे.

सहा पदरी रोड हा विना सर्व्हिस रोडचा असून, तो ९९ किलोमीटर पर्यंत असणार आहे. चार पदरी रोड विना सर्व्हिस रोडचा असून, तो ३७ किलोमीटर लांबीचा असेल.

 

Leave a comment