ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अट्टल दरोडेखोरांना अटक

दरोड्याचा एक आणि घरफोडीच्या पाच अशा सहा गुन्ह्यांत हव्या असलेल्या तसेच मारहाण, लूटमार करणा-यांना पोलिसांनी पकडले. पिंपरी पोलिसांनी औरंगाबाद आणि अक्कलकोटच्या जंगलातून दरोडेखोरांना जेरबंद केले.

९५ तोळे दागिने जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी पाच अट्टल दरोडेखोर आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.

कारवाईनंतर दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच असे सहा गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडून ४७ लाख ५० हजार रुपयांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

हे आहेत दरोडेखोर

लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार, आप्पा रा. भोसले (वय ४०, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) त्याची साथीदार पत्नी सारिका संतोष चौगुले उर्फ पायल आप्पा भोसले, अक्षय मंगेश शिंदे (वय २२, रा. काजी तडमस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), अजय रिका उर्फ राहुल पवार (रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वेषांतर करून अटक

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करून घरफोडी व चोरी करणाऱ्या टोळीपैकी एक आरोपी लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार हा औरंगाबाद येथे नातेवाइकाकडे आश्रयास आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून औरंगाबादमधील वाळुंज येथून त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे चौकशी करून त्याने चोरी केलेले ३३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

आरोपी लिंग्या याला तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील घरफोडीच्या गुन्ह्यात वर्ग करून अधिक तपास केला असता त्याने त्याच्या चार साथीदारांची नावे सांगितली. तसेच, त्याच्याकडून आणखी १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

चार पथकांची कामगिरी

लिंग्या याचे साथीदार अक्कलकोट, सोलापूर, उस्मानाबाद, करमाळा येथील जंगलभागात वास्तव्य करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. त्यानुसार चार टीम तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आल्या.

पोलिसांनी अक्कलकोट परिसरात वेषांतर करून चार दिवस वॉच ठेवून जंगलात वास्तव्य करणाऱ्या आप्पा भोसले, त्याची पत्नी सारिका आणि अक्षय या तिघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचा पाचवा साथीदार अजय यालादेखील पोलिसांनी अटक केली.

सहा गुन्हे उघडकीस

सर्व आरोपींकडून पोलिसांनी एकूण ४७ लाख ५० हजारांचे ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील तीन, देहूरोडमधील दोन घरफोडीचे, तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील दरोड्याचा एक, असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी पाच घरफोडीच्या गुन्ह्यात हे आरोपी पसार होते.

You might also like
2 li