माहिती अधिकार कार्यकर्त्याची संपत्ती किती असावी, काही अंदाज ? एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा मुखवटा घालायचा आणि दुसरीकडं लोकांची फसवणूक करायची, ब्लॅकमेल करून जमिनी गिळंकृत करायच्या, असा प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे यानं केला. त्याच्या नावावर दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे.

दीड वर्षे फरार राहिल्यानंतर ब-हाटे शरण

जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणं अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे हा आज दुपारी पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत स्वत: हून शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब-हाटे याच्या शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.

पोलिसांनी शरण यायला पाडले भाग

पोलिसांनी गेल्या काही दिवसांत ब-हाटे याच्या जवळच्या व्यक्तीविरोधात कारवाई केली. त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर यांच्याबरोबर पिंताबर धिवार, त्यांचे वकील अॅड. सुनील मोरे यांना अटक केली.

Advertisement

पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर ब-हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलिस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलिस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ब-हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिस दलाचे अखंड प्रयत्न सुरू होते. ब-हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता.

त्या वेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

Advertisement