file photo

मुंबई : मुंबईत कोसळणा-या पावसाने तीन ठिकाणी दरडी घरावर कोसळून झालेल्या अपघातात २२ जणांचे बळी गेले.

मुंबईची झाली तुंबई

रात्रभरापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना झाल्या. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, धारावी, अंधेरी, कांदिवली, मिरारोड यांसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

Advertisement

रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबईतील पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ही बंद झाली आहे.

मुंबईतील चेंबुर, विक्रोळी आणि भांडूप या भागात पावसामुळे शनिवारी मध्यरात्री तीन दुर्घटना घडल्या आहेत. यात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य बळीही पावसाने घेतले आहेत.

चेंबूरमध्ये 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली, तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. सध्या घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक दाखल झाले आहे. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

विक्रोळीत तीन, तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू

विक्रोळी पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंचशील चाळीतील सूर्या नगर परिसरात ही घटना घडली. शनिवारी मध्यरात्री दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास पाच ते सहा घरांवर दरड कोसळली.

दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, तिघा जणांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. दोन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांडुप परिसरात वनविभागाची भिंत कोसळली आहे. यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Advertisement