शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे. पण तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण ते बाण चालवण्यासाठी धनुष्य तर लागेल ना?

ताे धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता.१९) भाजपला दिला.

उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे.

एक मेला की दुसर्‍याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. अशा पद्धतीने भाजपला शिवसेना संपवायची आहे.

पण तुम्ही सतर्क राहा. आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत.

उत्तर भारतीय एकता मंचच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील ३२ वर्षे आम्ही शिवसेनेसोबत आहोत.

सध्या शिवसेनेचा कठीण काळ सुरू आहे. पण या संकटाच्या काळात आम्ही ठामपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.