मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभी केलेली स्फोटके भरलेली कार आणि या कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याची आता शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी ईडी चौकशी करणार आहे. दोन दिवसांत ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

तळोजा कारागृहात जाऊन चौकशी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याच्या आरोपात वाझे याच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) सज्ज झाले आहे.

तळोजा कारागृहात जाऊन येत्या दोन दिवसांत ही चौकशी होईल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

न्यायालयाची परवानगी

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबतचा आरोप केला होता. या आरोपान्वये ‘ईडी’ ने पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे.

देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहायक या प्रकरणी अटकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या चौकशीसाठी ‘ईडी’ला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

परमबीर यांनाही समन्स जावणार

‘ईडी’ तील सूत्रांनी सांगितले, की ‘वास्तवात ही चौकशी शनिवारीच होणार होती; पण आता ती पुढील दोन दिवसांत होईल.

Advertisement

देशमुख यांनी सांगितल्यानुसार नेमकी कशी व कुठून खंडणी मागितली गेली, यासंबंधी सचिन वाझेची उलट तपासणी या वेळी होईल. या चौकशीनंतर परमबीर सिंह यांनादेखील चौकशीचे समन्स बजावले जाईल.’

पन्नास कोटींची खंडणी जमा

दरम्यान, १०० कोटी रुपयांच्या खंडणीपैकी जवळपास ४० ते ५० कोटी रुपयांची गोळा झाली होती, असा ‘ईडी’चा संशय आहे. या ५० कोटींपैकी ४.७० कोटी रुपयांच्या रक्कमेची नेमकी माहिती ‘ईडी’च्या हाती आहे.

ही रक्कम बनावट कंपन्यांत गुंतविण्यात आली असल्याची कागदपत्रे ‘ईडी’कडे आहेत. त्याआधारेच सचिन वाझे व परमबीर सिंह यांची चौकशी होईल, असे ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले.

Advertisement