“2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत बिघाडी होऊ नये, म्हणून मी माघार घ्यायला तयार होतो, मी शरद पवार यांनाही सांगितलं होतं; मात्र निवडणूक तुलाच लढवायची आहे, हे मला शरद पवारांनीच सांगितलं आणि हे अजित पवार (Ajit Pawar) यांनाही सांगू नका” असं सांगितल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटलांना शरद पवार यांचाच कोलदांडा

हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाला शरद पवार यांनीच खिळ घातली का? अशी चर्चा भरणे यांच्या वक्तव्यामुळे रंगली आहे. इंदापूरच्या जागेविषयी भरणे पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

जाएंट किलर भरणे

दत्ता भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आणि चार वेळा आमदार राहिलेले पाटील यांचा पराभव करून 2014 मध्ये भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागा जिंकली होती.

Advertisement

त्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले होते. पाटलांना हरवून भरणे जाएंट किलर ठरले होते.

2019 च्या विधानसभेआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. त्याचवेळी हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपत प्रवेश केला होता.

भाजपच्या तिकिटावर ते इंदापुरातून मैदानात उतरले; मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भरणे यांनी आपली जागा राखत पाटलांना धोबीपछाड दिली.

Advertisement

त्यानंतर भरणे यांना ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आले.

भरणे काय म्हणाले ?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन ऊर्जा मिळाली. शरद पवार हे कार्यकर्त्यांचं मन जाणणारे आहेत. इथे कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. कार्यकर्त्यांनी चांगलं वातावरण निर्माण केलं आहे.

मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, कारखान्याचा संचालक होईन, असं वाटलंही नव्हतं; मात्र साडेबाविसाव्या वर्षी पवार यांनी संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली.

Advertisement

1996 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना” अशी यादी भरणे वाचून दाखवत होते.

बंडखोरीचा उल्लेख

“2009 ला पक्षासोबत बंडखोरी केली आणि मी बाजूला झालो. थोड्या मताने माझा पराभव झाला. 2012 ला पवार साहेबांनी देशाच्या कमिटीवर घेतलं.

पवार यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. काम करायचं ठरवलं. 2014 ते 2019 ला जास्त निधी आणला. 1305 कोटी रुपयांचा निधी आणला” असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

राष्ट्रवादीचा महापाैर करा

“शरद पवार, अजित पवारांना भेट द्यायची असेल तर पुण्यात राष्ट्रवादीचा महापौर करा, ही खरी भेट असेल. मीसुद्धा पुण्यात राहतो मीही सहकार्य करेन” अशी ग्वाही भरणे यांनी दिली.

चांगली माणसं येत आहेत पक्षात

“मी कॅबिनेट करायला तयार आहे; मात्र अडचणी येतील म्हणून पीडब्लूडी हे खातं दिलं, हे मन जाणणारे पवार आहेत. पक्षाला खूप भविष्य आहे.

चांगली माणसं आपल्या पक्षात येत आहेत, मी हे ऐकलंय, आपलंच घोडं पुढे रेटायचं नाही, माघार घेतली की विचार केला जातो, असे ते म्हणाले.

Advertisement