पुणे – एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपासोबत (bjp) सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि शिवसेनेनं (shivsena) हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, या युतीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर भाजपाकडून खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “संभाजी ब्रिगेडने 2019 मध्ये 40 जागांवर निवडणूक लढवली. त्यांना 0.06 टक्के मतं मिळाली.

उद्धव ठाकरेंना इतकी कमी मतं मिळवणाऱ्या पार्टनरसोबत युती करावी लागतेय. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष त्यांच्याशी युती करायला तयार नाही. संभाजी ब्रिगेडसोबत जाऊन काही होणार नाही.’ असं बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

मात्र, आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेला संभाजी ब्रिगेड कडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला असल्याचे दिसून आले आहे.

“शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे भाजपाची झोप उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) का तुमचा पोटशूळ उठला आहे? का संभाजी ब्रिगेडची एवढी भीती वाटते?

झंडू बाम घेऊन ठेवा, कारण तुमची अजून झोप उडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “की आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले, असे भाजपा विचारत आहे.

पहिल्याच निवडणुकीत बहुमताची अपेक्षा कशी काय करता, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात सत्तेत यायला किती वर्षे लागली? सतत नशेमध्ये बोलून चालत नाही”. असं संतोष शिंदे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय? म्हणाले…

‘आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत,

की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत’. असं ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.